भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरातील सिंधी लाईन परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी ४९ वर्षीय व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई भंडारा गुन्हे शाखेच्या पथकाने केली.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे,उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिंधी लाईन येथील रामू गोविंदराव गुरुनानी (४९, लाखनी) याच्या दुकानाच्या गोदामावर छापा टाकला.यावेळी पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला.महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याच्या विक्रीवर बंदी असताना हा साठा बेकायदेशीरपणे साठवून ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी रामू गुरूनानी विरुद्ध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
