भंडारा, देशात 25 जून 1975 रोजी आणिबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज 25 जून रोजी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात ज्या नागरिकांनी तुरुंगवास भोगला व भुमिगत राहून कार्य केले अशा नागरिकांचा इतिहास छायाचित्र व माहितीच्या स्वरुपात या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज जिल्ह्यातील आणीबाणीच्या काळात यातना सोसलेल्या संघर्ष योध्यांचा मुख्यमंत्री महोदयांची स्वाक्षरी असलेल्या सन्मानपत्रांनी सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच या ठिकाणी माहिती कार्यालयाच्यावतीने आणीबाणीच्या कालावधीतील छायाचित्र व माहिती प्रदर्शनाचे आयोजन ऑफिसर क्लब येथे करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन फित कापून जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्या हस्ते आज करण्यात आले. तसेच यावेळी आणीबाणीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेले नागरिक व त्यांचे कुटुंबिय व वारसाधारक उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, उपमुख्य कार्यकारी उमेश नंदागवळी ,जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी, महीला व नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. हे प्रदर्शन दि.28 .6.2025 पर्यत सर्वांसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत खुले राहणार असून नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन भंडारा जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
