गणेशपूर ग्रामपंचायतच्या सरपंच विद्या मेहर यांना पुन्हा अपात्र ठरविण्यात आले आहे.राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने हा निर्णय दिला आहे.त्यांच्याविरुद्ध अपर आयुक्त नागपूर विभाग,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, भंडारा आणि गणेशपूर येथील गोवर्धन साकुरे यांनी अपील केले होते.या निर्णयामुळे गणेशपूर येथील ग्रामपंचायतच्या राजकारणाला पुन्हा आता एकदा कलाटणी मिळाली आहे. विद्या मेहर यांच्यावर २०२३-२४ करिता ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार न करणे,८फेब्रुवारी २०२३ च्या ग्रामसभेमध्ये नियमबाह्यपणे ठराव जोडणे,बोगस देयके जोडून बेकायदेशीर खर्च दाखविणे,पदाचा दुरूपयोग करून जिल्हा परिषद शाळेसमोरील शासकीय सुलभ शौचालय पाडणे आदी आरोप करण्यात आले होते.यानंतर त्यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र केले होते.
.यावर सरपंच विद्या मेहेर यांनी, आपल्या विरुद्ध पारित केलेले आदेश प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात न घेता पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे अपिल ग्रामविकास मंत्रालयाकडे केले होते.यावर त्यांना तात्पुरता स्थगनादेश मिळाल्याने,विद्या मेहर पुन्हा सरपंच पदावर आल्या होत्या.यादरम्यान, हे अपिल सुरूच होते.गोवर्धन साकुरे यांनी त्यांच्यावरील आरोपाची पुन्हा उजळणी केली होती.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही आपल्या अहवालामध्ये त्यांच्याविरुद्ध अभिप्राय नमूद केले होते.एवढेच नाही तर अपर आयुक्त नागपूर विभागाच्या १२ जानेवारी २०२४ तारखेच्या सुनावणीमध्ये त्यांच्याविरुद्ध बाबी सिद्ध झाल्या होत्या.या सर्व बाबींचा विचार करता,ग्रामविकास मंत्रालयाने विभागीय आयुक्तांचा आदेश कायम ठेवून विद्या मेहर यांचे अपिल अमान्य केले.त्यामुळे आता त्यांच्यावर पुन्हा पद सोडण्याची पाळी आली आहे.
