पावसाळ्यातील पूर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने उचलले पाऊल…
राष्ट्रीय गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या धरणातून जिल्हा प्रशासनाने ८० क्युसेक पाण्याचा विसर्ग शनिवारपासून सुरू केला आहे. सध्या हा प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. भविष्यात वैनगंगेच्या खोऱ्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यास वैनगंगा आणि भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा प्रकल्प रिकामा करून ठेवला जात आहे.गोसीखुर्द प्रकल्पामध्ये सध्या ११०.१५४ दशलक्ष घनमीटर (१४.८८ टक्के) जिवंत साठा आहे.धरणाची पाणीपातळी २४१.६४० मीटर नोंदली गेली.प्रकल्पाची उच्चतम पाणीपातळी २४५.५०० मीटर आहे.यावेळी मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रिय असल्याने सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आणि वैनगंगेच्या खोऱ्यात कधीही मुसळधार पावसाची शक्यता आहे.यामुळे भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते.यामुळे संभाव्य पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रकल्पात पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून येथून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
