नागपुर – उच्चविद्याविभूषित आणि प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ.माधुरी गोविंदराव सावरकर यांची आता नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.भंडारा जिल्ह्याच्या रहिवाशी असलेल्या डॉ.माधुरी गोविंदराव सावरकर यांनी बीएससी, बी. ए, बी. एड, एम.एस. सी.(गणित), एम. ए.(इंग्रजी), एम. ए.(P.A.), एम. एड , एम. फिल, पी.एच.डी.(Edu.) सेट तसेच नेट परीक्षा प्राविण्यसह उत्तीर्ण केलेल्या आहेत.त्यांची एमपीएससी तर्फे वर्ग “अ’ निवड करण्यात आली असून सन २०१४ ते १५ या सत्रात जपान येथे अभ्यास दौरा करून आल्या आहेत. डॉ.माधुरी सावरकर यांना प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे.त्या नागपूर येथील एसआयएससीच्या संचालक,नागपूर विभागीय माध्यमिक,उच्च माध्यमिक बोर्डाच्या सहसचिव,सचिव तसेच बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम सांभाळले आहे.
वर्धा येथील जिल्हा परिषदेत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळले तर पदोन्नतीनुसार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे येथे उप संचालक म्हणून यापूर्वी कार्यरत होत्या.रत्नागिरी येथेही विभागीय बोर्डाचे अध्यक्ष पद डॉ.माधुरी सावरकर यांनी सांभाळले आहे.
सध्या बोगस शालार्थ आय डी घोटाळ्याची नागपूर विभागात मोठी चर्चा आहे.उपसंचालक उल्हास नरड ,उपसंचालक चिंतामण वंजारी यांना बोगस शालार्थ आय डी प्रकरणात अटक झाली असून माजी उपसंचालक सतीश मेंढे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अद्याप अटक झाली नाही.अशावेळी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक पद कोणताही अधिकारी स्वीकारायला तयार नव्हते.मात्र अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक असलेल्या डॉ.माधुरी सावरकर यांची शिक्षण संचालकांनी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदी नियुक्ती केली आहे. घोटाळेबाजांना शिक्षा आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगतिशील सुधारणा करून पारदर्शकता आणण्याची मोठी जबाबदारी आता डॉ.माधुरी सावरकर यांच्यावर आली आहे.
