यावर्षी भंडारा जिल्ह्यात घेण्यात आलेल्या सारस गणनेत एकूण चार सारस पक्ष्यांची नोंद घेण्यात आली आहे.मागील वर्षीही चार सारसांची नोंद झाली होती. त्यातील दोन अवयस्क होते.विशेष म्हणजे,यावर्षी पहिल्यांदाच जिल्ह्यात सारसच्या दोन वेगवेगळ्या जोड्या पाहण्यात आल्या.त्यापैकी एक जोडी गोंडीटोला ते बपेरा शेतीशिवार परिसरात तर दुसरी जोडी कवलेवाडा बॅरेज नजीक वांगी या गावाच्या शेतीशिवार परिसरात आढळली.ही सारस गणना भंडारा वनविभाग व सेव इकोसिस्टम अँड टायगर (सीट) च्या संयुक्त प्रयत्नाने घेण्यात आली होती. जिल्ह्यातील भंडारा,मोहाडी व तुमसर तालुक्यातील सारस अधिवास क्षेत्रातील एकूण १८ ठिकाणी गणना करण्यात आली.त्यात वनकर्मचारी, सीट संस्थेचे स्वयंसेवक व ९ सारसमित्रांच्या चमूचा सहभाग होता. १८ स्थळे सुनिश्चित करून पहाटे ५ वाजेपासून १० वाजेपर्यंत ही गणना पूर्ण करण्यात आली.त्यानंतरही संभावित क्षेत्राची न्याहाळणी वनकर्मचारी व सारसमित्रांद्वारे करण्यात आली.सारस बचावासाठी जिल्हा प्रशासनासह पक्षीप्रेमींनी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली.
