हद्दपारीची कारवाई टाळतो.मात्र त्यासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपीकडे करणाऱ्या पवनीतील पोलिस कर्मचाऱ्यावरच आरोपीच्या पिंजऱ्यात पोहोचण्याची पाळी आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नसली तरी, गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई सुरू आहे.अजित प्रल्हाद वाहने (३७) असे या पोलिसाचे नाव असून तो पवनीच्या पोलिस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत आहे.
तक्रारदाराच्या भावाविरुद्ध मुंबई पोलिस कायदा कलम ५६ नुसार, पवनी पोलिस ठाण्याकडून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. त्याच्या हद्दपारीची मुदत दिनांक १३ जूनला संपणार होती.या दरम्यान, अजित वाहने याने हद्दपारीतील संबंधित आरोपीच्या भावाला पोलिस ठाण्यात बोलावले. तुझ्या भावावर पुन्हा तडीपारीची कारवाई किंवा अन्य कसलीही प्रतिबंधक कारवाई करायची नसेल तर त्या बदल्यात १० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. या प्रकरणाची तक्रार संबंधित तक्रारदाराने १२ जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. या तक्रारीवरून १३ आणि १४ जूनला पडताळणी करण्यात आली असता, त्याने स्वतः रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
