११ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त अड्याळ, लाखनी व स्थागुशा पोलिसांची कारवाई….
भंडारा स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस स्टेशन अड्याळ व लाखनी यांनी संयुक्त कारवाई करीत ट्रॅक्टर ट्रॉली व मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन ५ अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी ५ गुन्हे उघडकीस करीत त्यांच्या ताब्यातून ११ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतून एक ट्रॅक्टर ट्रॉली चोरी गेल्याची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर अड्याळ पोलीस रात्रगस्तीवर असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन नाकाबंदी केली. भंडारा येथील नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच पोलीस स्टेशन अड्याळ लाखनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रस्त्यावर नाकाबंदी केली. त्यादरम्यान संशयितरित्या ट्रॅक्टरला थांबवून चालक विकल्प टेंभेकर (१९) रा. धारगाव याची कसून चौकशी केली. चौकशीत सदर ट्रॉली खैरी येथून चोरल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता अन्य साथीदार शांतनू शेंडे (१९) अनिष बागडे (२२)
सागर वैरागडे, विशाल बागडे (२७) रा. नेरी यांच्या मदतीने चोरी करुन विक्री करण्याकरीता परसोडी येथे लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी चितापूर, जवाहरनगर व परसोडी येथून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक ट्रॅक्टर, पाच ट्रॉली, दोन दुचाकी व चार मोबाईल, असा जवळपास ११ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली









