मानव व वन्यजीव संघर्ष हा काही विषय नवीन नाही. मात्र, मानवी वस्तीत वन्यप्राण्यांच्या शिरकाव ही खरच गंभीर धोकादायक बाब आहे. याच संघर्षातून गत अडीच महिन्यांत सहा वाघांचा तर दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. विविध कारणांहून या वन्यप्राण्यांचा जीव गेला असला तरी भविष्यकालीन व पर्यावरणासाठी ही धोक्याची घंटा आहे.
भंडारा जिल्हा साधन संपत्ती विशेषतः वनसंपदेने नटलेला आहे. यात हिंस्र प्राण्यांची कमतरता नाही. वाघोबांची संख्या तर दिवसेगणिक वाढत आहे. अभयारण्याच्या क्षेत्राच्या मानाने वाघ, बिबट, नीलगाय, अस्वल, कोल्हा यासह अन्य शेकडो वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. वर्षाच्या प्रारंभ काळातच सहा वाघांचा मृत्यू झाला. विविध कारणांनी या वाघोबांचा जीव गेला. यात दोन छावकांचाही समावेश आहे. दोन बिबट्यांचाही मृत्यू होण्यास कारणे आहेत. या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यात वनविभाग लागले असले तरी वन्यप्राण्यांचा जीवही वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. वाघांच्या मृत्यूंमध्ये झालेली ही वाढ निश्चितच चिंताजनक आहे. राज्य सरकारने निवासी क्षेत्रांना लागून असलेल्या वनक्षेत्रात साखळी कुंपण बसवण्याच्या योजनेला मान्यता दिली होती. वनमंत्र्यांनी यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूदही केली होती, ज्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील कोकासह गावांना लागून असलेल्या वनक्षेत्रात २० कोटी रुपये खर्चुन साखळी कुंपण बसवण्याचे काम प्रस्तावित होते. परंतु, पाच महिने लोटूनही जिल्ह्यात या दिशेने कारवाई झालेली नाही.
