गोंदिया येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती आज (ता.19) गोंदियात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी मनोहर चौक, गोंदिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपविभगीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, न.प.मुख्याधिकारी संदिप चिद्रवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. महेंद्र गजभिये यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. सदर पदयात्रा मनोहर चौक, गोंदिया येथून शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीमच्या तालात निघाली व जयस्तंभ चौक मार्गाने मार्गक्रमण करुन इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे या पदयात्रेची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट-गाईड व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
