नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण
शासनाच्या अनुकंपा नियुक्ती योजनेअंतर्गत पात्र वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण होत भंडारा जिल्ह्यातील 165 अनुकंपा धारक यांच्यासह जिल्हा परिषदेमधील सरळ सेवेने नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने आज पोलीस मुख्यालयातील पोलीस बहुद्देशीय सभागृहात भव्य कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलिस अधीक्षक नुरूल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती लिना फलके-ढेंगे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी नियुक्तीपत्रांचे वितरण करताना सांगितले की, “भंडारा जिल्ह्यातील 165 अनुकंपा धारकांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. शासनाच्या अनुकंपा नियुक्ती योजनेमुळे दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होते आणि त्यांच्या उपजीविकेची घडी बसण्यास मदत होते.”
त्यांनी पुढे सांगितले की, शासनाकडून मिळालेली ही अनुकंपा नियुक्ती केवळ नोकरी म्हणून न पाहता, जनतेची सेवा करण्याची जबाबदारी म्हणून घ्यावी. शासकीय सेवेत दाखल होताना प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कर्तव्यभावनेने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. “आपल्या कार्यातून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाची परंपरा पुढे नेण्यात आपण नक्कीच यशस्वी व्हाल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले की, “कुटुंबातील व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू ही मोठी हानी असते. मात्र शासनाच्या अनुकंपा नियुक्ती योजनेमुळे त्या कुटुंबाला नवी उभारी मिळते. आज नियुक्तीपत्र प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारांनी ही संधी मोठ्या जबाबदारीने स्वीकारून समाजसेवेसाठी समर्पित वृत्तीने कार्य करावे.”
त्यांनी पुढे सांगितले की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आपल्या कार्यामुळे नागरिकांचा शासकीय यंत्रणेवर विश्वास दृढ होईल आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रशासनासोबत हातात हात घालून कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमादरम्यान राज्यस्तरीय कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबोधन देखील ऑनलाइन पद्धतीने दाखविण्यात आले.
अनुकंपा नियुक्ती प्राप्त उमेदवारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. शासनाच्या या उपक्रमामुळे दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळत असून, त्यांचे भविष्य अधिक स्थिर होत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.









