पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारात एका युवतीवर बुधवारी पहाटे बलात्काराची घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सरकारवर आरोप करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पोलिसांकडून आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथके स्थापन करण्यात आली असून अद्याप आरोपी मोकाट आहे. या घटनेवर आज दिवसभरात अनेक पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसेच बीडमधील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आज आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. कालच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आज जागतिक मराठी भाषा दिन आहे. सरकार आणि काही संघटनांकडून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
