पत्नीचा फोन आल्याचे आईला सांगून घराबाहेर गेलेल्या सुदत्त दौलत रामटेके या ४५ वर्षीय व्यक्तिचे प्रेत दरम्यान वैनगंगा नदी पात्रात आढळून आले.त्याने मानसिक तणावातून वैनगंगेत उडी घेऊन जीवन संपविल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. भंडारा तालुक्यातील माटोरा येथील सुदत्त रामटेके हा मागील काही दिवसांपासून नागपूर येथे कुटुंबासह रोजनदारीच्या कामाला गेला होता. १५ दिवसाअगोदर तो माटोरा येथे स्वगावी आला होता.दरम्यान त्याने पत्नीचा फोन येत आहे,मी बोलून येतो,असे आईला सांगून घरुन निघून गेला होता.तेव्हापासून तो घरी परत आला नाही.त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र आढळून आला नसून अखेर कारधा वैनगंगा नदीपात्रात लहान पुलाजवळ एका व्यक्तिचे प्रेत तरंगतांना आढळून आले.माहिती मिळताच कारधा पोलीस स्टेशनचे पोहवा पुरुषोत्तम थेर, पोशि किरण नवघरे यांनी घटनास्थळ गाठून स्थानिक गोताखोरांच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढले. प्रेताची तपासणी केली असता त्याच्या खिशात आधार कार्ड आढळून आला.त्यावरुन पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून ओळख पटविली. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. मृतक याने मानसिक तणावातून वैनगंगेत उडी घेऊन जीवन संपविल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कारधा पोलिसात मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
