स्थानिक नूतन कन्या शाळेत माता पालक मेळाव्यानिमित्त ‘परीक्षेला सामोरे जातांना’या विषयावर मार्गदर्शन व विदयार्थिनींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान माता पालक संघाच्या अध्यक्ष तथा नूतन कन्या शाळेच्या प्राचार्य निलु तिडके यांनी भूषविले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्रतिभा मुनिश्वर,पालक प्रतिनिधी सुरेखा शेंडे उपस्थित होते.
‘आई ‘ही उर्जेची दिव्य स्त्रोत असून स्वतःतील अलौकिक स्त्रीशक्तीचा जागर करुन पाल्यांचे संगोपन मातांनी करावे असे मत याप्रसंगी निलु तिडके यांनी व्यक्त करून माता पालकांची भूमिका स्पष्ट केली तसेच शालेय परीक्षांसोबतच जीवनाच्या परीक्षांना पाल्यांना सामोरे जातांना आई पालकत्व सजग असावे यावरही प्रकाश टाकला.मोबाईलच्या व्यसनापासून मुलांना दूर ठेवण्याकरिता पालकांनी मुलांसोबत वेळ घालवावा, त्यांचे मित्र व्हावे असे मत प्रतिपादन मुनिश्वर यांनी केले.माता पालक शेण्डे यांनी आईने स्वतःला मुलींच्या प्रगती करिता स्वतः मध्ये बदल घडवावा असे मत व्यक्त केले.शिष्यवृत्ती परीक्षेचे वर्ग व सराव परीक्षा यासंदर्भात सहाय्यक शिक्षिका मनीषा रहांगडाले व जयश्री केळवदे यांनी मार्गदर्शन केले.
किशोरवयीन मुलींना समजून घेतांना त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांना समजून घेणे व त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून प्रेमपूर्वक वागणूक देणे या विषयावर रश्मी मोहरकर यांनी समुपदेशन केले. तसेच परीक्षेला सामोरे जाताना आहार व आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावरही मार्गदर्शन केले. याप्रसंगी माता भगिनींशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून समुपदेशन करण्यात आले.पालक घुमे व काही मातांनी पाल्यांचे कलागुण ओळखून त्यांना मंच उपलब्ध करुन दयावा असे आव्हान केले.या स्तुत्य उपक्रमाचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष ऍड. एम. एल भुरे, सचिव शेखर बोरसे व व्यवस्थापन मंडळाचे सर्व सदस्य यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रोहिणी मोहरील यांनी केले तर आभार लीना चिचमलकर यांनी मानले.या प्रसंगी पर्यवेक्षक श्रद्धा रामेकर व प्रिया ब्राह्मणकर यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माता पालक संघांचे शिक्षक सदस्य रोशनी चन्नावार, वैशाली टेकाम, वर्षा ठवकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
