गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत १९ दुचाकी चोरणाऱ्या दोन जणांना रंगेहात पकडण्यात आले तर अन्य एक जण फरार आहे…
भंडारा जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस ठाणे नोंदीत असलेल्या दुचाकींची व चोरीचे गुन्हेगार तपासणी करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेला दुचाकी चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने अड्याळ
पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या श्रीनगर येथील सोनू उके याच्या घरी जावून तपासणी केली. यात त्याच्या घरी ठेवून असलेल्या दहा दुचाकी आढळल्या. वाहनांची कागदपत्रे मागितली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.
चौकशीदरम्यान त्याने या दुचाकी चोरीच्या असल्याचे कबूल करीत नितीन खोब्रागडे व प्रवीण कंगाले या सहभागींची माहिती दिली. या माहितीवरून सोनूला सोबत घेवून वाकेश्वर येथे खोब्रागडे याच्या घरी झाडाझडती घेतली. तिथून पोलिसांनी नऊ दुचाकी हस्तगत केल्या. त्याच्याकडेही कुठल्याही दुचाकीची कागदपत्रे नव्हती. वाहन पोर्टलवरून दुचाकीचा खरा नंबर व मालकांची यादी काढण्यात आली. तपासाअंती तिघांनी विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे कळले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी करार आहे.
