तुमसर तालुक्यात लहान महादेव गायमुख येथे जाणाऱ्या भरधाव वाहनातून अचानक धूर निघू लागला. एका दुचाकी वाहनचालकाने धूर निघत असल्याचे चालकाला सांगितले. त्याने तत्काळ वाहन थांबविले. त्यानंतर वाहनातील सात लोकांनी उडी घेतली. वाहनचालकाच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली. ही घटना तुमसर-कटंगी आंतरराज्य मार्गावर मेहेगाव येथे जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यावर घडली.
सहा सात युवक वाहनाने लहान महादेव गायमुख येथे यात्रेनिमित्त निघाले होते. वाहनाच्या मागील भागात सहा युवक बसले होते. त्यांना चालकाने धूर निघत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी वाहनातून उड्या घेतल्या. वाहनात असलेल्या गाद्या एका युतकाने खाली फेकल्या. वाहनचालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. यात्रेचा काळ असल्याने हा मार्ग वर्दळीचा होता. परिणामी वेळीच मदत मिळाली. त्यामुळे ट्रक थांबवुन आग विझविण्यात आली.
