गोरेगाव तालुक्यातील ग्राम सोनी येथील प्रकरण …
शनिवारी निघाली होती घरातून…
तालुक्यातील ग्राम सोनी येथे नवीन तलावात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली काल दुपारी १२ वाजेदरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली असून चित्रांशी सुरेंद्र बोपचे (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे.
चित्रांशी बोपचे ही शनिवारी (दि. २९) सकाळी ११:३० वाजता दरम्यान घरातून बाहेर निघून गेली होती. दुपारच्या सुमारास कुटुंबियांनी इकडे-तिकडे तिचा शोध घेतला. यातच सोनी येथील नवीन तलाव येथे तिच्या चपला असल्याचे कुणीतरी सांगितले. यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी नवीन तलाव येथे चित्रांशीचा शोध घेतला मात्र तिचा थांगपत्ता लागला नाही. मात्र शनिवारी (दि. ३०) आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकाने सकाळपासूनच नवीन तलावात शोध मोहीम राबविली असता दुपारी १२:३० वाजता दरम्यान चित्रांशीचा मृतदेह हाती लागला. चित्रांशीच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नसून तिच्या मृत्यूबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. गोरेगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला असून तपास सुरू आहे.
